छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) मनी एक्सचेंजसाठी बोलावलेल्या दोघांना भेटण्यासाठी गेलेल्या व्यवसायिकांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करीत सव्वा पाच लाखांची बॅग चोरट्यांनी लंपास केली. ही घटना गारखेडा परिसरातील विद्यानगरात घडली.
उस्मानपुरा येथील शाह कॉलनीतील रहिवासी तेजपालसिंग सुंदरसिंग साहानी यांना शुक्रवारी सायंकाळी त्यांना एका ट्रॅव्हल्समधून माही खान नामक व्यक्तीचा फोन येऊन ग्राहकाला डॉलर एक्सचेंज करायचे असून ते लोकेशन आणि नंबर पाठवतील, असे सांगितले. साहनी त्या अपार्टमेंटसमोर पोहोचले खरे, पण तिथे डॉलर घेणारे ग्राहक नव्हे तर चोरटे दबा धरून होते. चोरट्यांनी डोळ्यात मिरचीपूड टाकली अन् वारही केले. डोळ्यात मिरची पूड आणि अंगावर रक्ताच्या धारा वाहत असतानाही तेजपालसिंग साहानी यांनी हार न मानता चोरांचा पाठलाग केला. मात्र ५ लाख १७ हजारांची बॅग घेऊन लुटारू पसार झाले. साहानी यांनी तातडीने पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. गारखेडा परिसरात ही घटना घडली.
डॉलर चलनात बदलण्याचे निमित्त
साहानी यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला असता, समोरून ५ हजार ५०० यूएस डॉलर तातडीने भारतीय चलनात बदलून हवे असल्याचे सांगण्यात आले. समोरच्या व्यक्तीने ५ लाख १७ हजार रुपये घेऊन विद्यानगरमधील अभिनव स्वकल्प अपार्टमेंटसमोर येण्यास सांगितले. साहानी आपली दुचाकी (एमएच-२०-जीटी-५१३७) घेऊन सायंकाळी विद्यानगरला पोहोचले. ते तिथे पोहोचल्यानंतर हा प्रकार घडला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












